Sorry, this article is unavailable in your chosen language.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फर्टिगेशन करताना घ्यावयाची काळजी...
विद्राव्य खतांचा ठिबक सिंचनामधून वापर करण्याच्या तंत्रास फर्टिगेशन तंत्र म्हणतात. सूक्ष्म सिंचन पद्धतीने सिंचनाबरोबर वाढीच्या विविध अवस्थेत लागणाऱ्या विद्राव्य खतांचा पुरवठा हा दररोज किंवा दिवसाआड थेट पिकांच्या मुळांच्या कक्षेत केला जातो, या संकल्पनेला फर्टिगेशन असे म्हणतात. ठिबक सिंचनाद्वारे पिकांचे पाणी व्यवस्थापन करताना पिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊनच योग्य मात्रेत पाणी द्यावे. ठिबक सिंचन संचामधून सर्वत्र पाणी एकसमान मिळते, याची खात्री करावी. फर्टिगेशन साधनाचा इंजेक्‍शन रेट चेक करावा. खतांच्या मात्रानुसार विद्राव्य खतांचे द्रावण तयार करावे. ठिबक सिंचनद्वारे जमीन वाफसा अवस्थेत आणून द्यावी. जमीन वाफसा अवस्थेत असल्यास ठिबकने जादा पाणी देऊ नये. विद्राव्य खतांचे द्रावण ठिबक सिंचनामधून जाण्यासाठी फर्टिगेशन टॅंक किंवा व्हेंचुरी बसविली असेल त्या ठिकाणाचा कंट्रोल व्हॉल्व्ह हळूहळू कमी करावा. म्हणजेच, इनलेट आणि आउटलेटमध्ये प्रेशर डिफरन्स निर्माण करावा, तरच विद्राव्य खतांचे द्रावण ठिबक सिंचनामधून पाण्यासोबत पिकांच्या मुळांजवळ पोचतील. ठिबक सिंचनामधून खते देऊन झाल्यावर ठिबक सिंचनाने ५ मिनिटे पाणी द्यावे. नंतर बंद करावे. जादा वेळ ठिबकने पाणी दिल्यास दिलेली खते पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्राबाहेर झिरपून जातील. ठिबक सिंचन संचातील फिल्टर्स वाळूचा फिल्टर, जाळीचा फिल्टर, मेन लाईन, सबमेन, लॅटरल, फिटिंग्ज, बॉल व्हॉल्व्ह व फ्लश व्हॉल्व्ह इत्यादी ठिकाणाहून होणारी गळती (लिकेज) पूर्णपणे बंद करावी. उत्कृष्ट फर्टिगेशन होण्यासाठी - • आराखड्याप्रमाणे शेतामध्ये ठिबक सिंचन संचाची उभारणी. • सिंचनाचे तंतोतंत, अचूक वेळापत्रक वापरावे. • जमिनीचे तापमान (मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये २२ ते २८ अंश सें असावे.) • खतांच्या द्रावणाची मुळांच्या कार्यक्षेत्रातील तीव्रता. • खते देण्याचा कालावधी, खते देण्याची योग्य साधने. • फर्टिगेशनसाठी शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा वापरावे. ठिबक सिंचनाद्वारे पिकांचे पाणी व्यवस्थापन करताना पिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊनच ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी द्यावे. जमीन वाफसा अवस्थेत राहील, याची काळजी घ्यावी. ठिबक सिंचनाद्वारे पिकांना जादा पाणी दिल्यास मुळांजवळ चिखल निर्माण होईल, मुळांजवळ हवा राहणार नाही; त्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण करता येणार नाही. शेतकरी बांधवानी वरील सर्व बाबींचा विचारपूर्वक वापर करून आवश्यक ती काळजी घेऊन फेर्टीगेशन च्या मार्फत आपल्या पिकांना विद्राव्य खते द्यावीत आणि उत्पादन वाढवावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
63
14
Related Articles